
जळगाव, ता. १० (जनसंवाद live): शहरातील कांचननगर भागातील विलास चौकात रविवारी (ता. ९) रात्री अकराच्या सुमारास गोळीबार झाला. यात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
आकाश मुरलीधर सपकाळे ऊर्फ डोया याने सागर कोळी याच्या घराजवळ येऊन गोळीबार केला. या घटनेत सागर कोळी यांच्या भाच्यासह तिघे जखमी झाले आहेत.
आकाश ऊर्फ टपऱ्या युवराज बाविस्कर याचा मृत्यू झाला, तर गणेश रवींद्र सोनवणे (वय २८) आणि तुषार रामसिंग सोनवणे (वय ३०) ऊर्फ साबू जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. आकाश युवराज बाविस्कर याच्या छातीतून गोळी निघून ती पाठीत बरगडीत रुतली. अत्यवस्थ परिस्थितीत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना, त्याचा मृत्यू झाला.
घटनास्थळावरून घेतलेल्या माहितीनुसार, कांचननगर भागातील विलास चौकात पूर्ववैमनस्यातून वाद झाला. वाद चिघळत गेला आणि काही क्षणांतच त्याचे रूपांतर थरकाप उडविणाऱ्या गोळीबारात झाले. संशयित मारेकरी आकाश सपकाळे ऊर्फ डोया याने सागर कोळी यांच्या घरासमोर येऊन पिस्तुलातून चार राउंड फायर केले. गोळीबार झाल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी आरडाओरड करून घराबाहेर धाव घेतली. नंतर संशयित डोया घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, एलसीबीचे कर्मचारी, तसेच शनिपेठच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले.
पोलिस पथकांनी परिसराला वेढा घालून तपास सुरू केला असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत केले आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुप्तता पाळण्यात आली होती. परिसरात वातावरण चिघळू नये, याची खबरदारी म्हणून मध्यरात्रीपर्यंत अधिकृत मृत्यूची घोषणा करण्यात आली नाही. मात्र, डॉक्टरांनी आकाशचा मृत्यू झाल्याचे खासगीत सांगीतले.




