जळगाव, दि. 28 (जनसंवाद न्युज): शहरातील लहान दुकानदार (हॉकर्स) यांना स्वाभिमानाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने रोजगार करण्याची संधी मिळावी यासाठी मराठी प्रतिष्ठान तर्फे एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जळगाव शहरातील १०० हॉकर्सना शासकीय योजनेद्वारे चालते-फिरते दुकाने म्हणून ई-रिक्षा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
“श्रम कमी, जास्त आर्थिक उत्पन्न” या विचारधारेवर आधारित या उपक्रमामुळे भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, आईस्क्रीम व लस्सी विक्रेते, पाणीपुरी विक्रेते, पाणी जार विक्रेते, कटलरी साहित्य विक्रेते, ब्रेड-बटर विक्रेते, शुभेच्छा पुष्पगुच्छ विक्रेते अशा अनेक लघु व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे. केवळ ५० रुपयांच्या खर्चात दिवसभर शहरभर सहज फिरता व्यवसाय करता येईल. अरुंद गल्लीबोळांत जाण्याची सोय असल्यामुळे विक्रीत वाढ होण्याचीही शक्यता आहे.
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रोजगारासोबतच शहर अतिक्रमणमुक्त करण्याची संकल्पना. फुटपाथ व रस्त्यांवर ठिकठिकाणी होणारे अतिक्रमण कमी होऊन शहर अधिक शिस्तबद्ध, स्वच्छ व सुसंस्कृत बनेल.
प्रदूषणमुक्त असलेल्या या ई-रिक्षा पर्यावरणालाही हातभार लावणार आहेत. तसेच शासकीय अनुदान आणि शासकीय बँकांमार्फत अर्थसाह्य मिळविण्यासाठी मराठी प्रतिष्ठान आवश्यक पाठपुरावा करणार आहे.
“हॉकर्सच्या आर्थिक प्रगतीसोबतच शहराचा विकास, स्वच्छता आणि शिस्त या तिन्ही बाबी साध्य करणे ही मराठी प्रतिष्ठानची भूमिका आहे. ई-रिक्षा ही काळाची गरज असून समाजहितासाठी उचललेले हे उपयुक्त पाऊल आहे,” असे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी सांगितले.




