Breaking
जळगावशैक्षणिक

एसडी-सीडतर्फे शुक्रवारी शिष्यवृत्तीचे वितरण

अभिनेते सचिन-सुप्रिया पिळगावकरांची प्रकट मुलाखत: अभिनेत्या दीप्ती भागवत यांची विशेष उपस्थिती

जळगाव, ता. 19 (जनसंवाद live): सिने अभिनेते व एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या हस्ते एसडी-सीड शिष्यवृत्ती वितरण सोहळा शुक्रवार दि. 21 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे होणार आहे. यावेळी चित्रपट सृष्टीतील पिळगावकर दाम्पत्याची प्रेरणादायी प्रकट मुलाखत प्रसिद्ध अभिनेत्या दीप्ती भागवत घेणार असल्याची माहिती माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी पत्रपरिषदेत दिली.

सचिन पिळगावकर यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेत, ज्यांनी अभिनेता, दिग्दर्शक, नृत्य कलाकार, गायक, परीक्षक आणि निर्माता म्हणून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी व टी व्ही जगतामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. बालकलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करून, त्यांनी ‘महागुरु’ म्हणून ओळख मिळवली आहे.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे ते दरवर्षी नवनवीन कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्र करतात. या वयातही त्यांच्यातील उत्साह, उर्जा सर्वाना आश्चर्यचकित करतो. सहा दशकांच्या त्यांच्या बहुआयामी कर्तृत्वाचा पट प्रेक्षकांसमोर उलगडला जाणार आहे. त्यांच्या जीवन प्रवासातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी आणि करिअरला नवीन दिशा देण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत होणार आहे.

हे मार्गदर्शन मुले व तरुणांसोबतच मोठी स्वप्ने पाहणाऱ्या सर्वांसाठीच अतिशय मोलाचे ठरणार असल्याची श्री. जैन यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना यशाचा महामंत्र देणात्या ह्या कार्यकमाला सर्वांनी उपस्थित रहावे, त्यांचा जीवन प्रवास व करिअरला दिशादर्शक असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, पालक, शिक्षक व प्राध्यापक, विद्यार्थी चळवळीशी संबंधित शिक्षणप्रेमींनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन एसडी-सीड अध्यक्षा रखाभाभी जैन, कार्याध्यक्षा मीनाक्षी जैन, गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी केले आहे.

जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा

गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि उद्योजकीय पातळीवर सक्षम बनवण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणा‌ऱ्या एसडी-सीड या शिष्यवृत्ती योजनेने यंदा 18 वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. ज्येष्ठ समाजसेवक सुरेशदादा जैन यांच्या प्रेरणेने सुरू झालेली ही योजना आज जळगाव जिल्ह्यातील सर्व जात, धर्म आणि घटकांतील विद्यार्थ्यांसाठी एक मजबूत आधार ठरली आहे. योजनेचा सामाजिक परिणाम उल्लेखनीय असून, गेल्या 18 वर्षात 15 हजार 500 शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. 3 हजार 800 उच्चशिक्षण पूर्ण करण्यात आले. 195 विद्यार्थी दत्तक, 24 विद्याथ्यांना इंटर्नशिप, तसेच 138 शैक्षणिक करार करण्यात आले आहेत. याशिवाय 49 हजार 427 विद्यार्थी प्रशिक्षित, 3 हजार 215 युवतींचे सशक्तीकरण, 600 विद्यार्थ्यांना उद्योजकता विकास मार्गदर्शन, 288 जणांना करिअर मार्गदर्शन आणि 373 विद्यार्थ्यांना मेंटरद्वारे मार्गदर्शन करण्यात आले आहे. एसडी-सीड योजना ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी नवीन संधीचे दार खुले करत असून, उच्च शिक्षण तसेच करिअर घडवण्यास मोठे योगदान देत आहे. योजनेच्या 18 वर्षाच्या कार्यकाळात निर्माण झालेला सकारात्मक बदल समाजातील सर्व घटकांना प्रेरणादायी ठरत आहे.

अद्वितीय सचिन पिळगावकर

अभिनेते सचिन पिळगावकर हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक बहुगुणी, लोकप्रिय आणि ज्येष्ठ कलाकार आहेत, ते अभिनेता, दिग्दर्शक, निमति, लेखक तसेच नृत्यदिग्दर्शक या अनेक भूमिकांमध्ये यशस्वी झाले आहेत. बालकलाकार म्हणून कारकिर्द सुरू केल्यानंतर त्यांनी लवकरच आपल्या अद्वितीय अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. मराठी चित्रपट, नाटक, मालिका तसेच हिंदी चित्रपट अशा सर्व माध्यमांमध्ये त्यांनी लक्षवेधी कामगिरी केली आहे. ‘बालपणाचा बापडा’, ‘गोलमाल’, ‘गंमत जंमत’ यासारख्या चित्रपटांमधील भूमिका आणि ‘तू तू मैं मैं’ या हिंदी मालिकेतील विनोदी अभिनयामुळे ते सर्वत्र प्रसिद्ध झाले. दिग्दर्शक म्हणून ‘रावसाहेब’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘तू तू मैं में’ इत्यादी कामांनी त्यांची कला अधिक वृद्धिंगत केली. कलाक्षेत्रातील योगदान, साधेपणा आणि सतत नवनव्या प्रयोगांची तयारी यामुळे सचिन पिळगावकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button