
जळगाव, दि. 22 ( जनसंवाद live): श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण अभ्यास सहलीचे आयोजन लांडोर खोरी येथे करण्यात आले. सहलीचा उद्देश विद्यार्थ्यांना निसर्गाशी प्रत्यक्ष जोडणे, जैवविविधतेचा अभ्यास करणे तसेच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावून देणे हा होता.
सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी वन परिसंस्था, विविध प्रकारच्या वनस्पती–औषधी वनस्पती, पक्षीजीवन, पाणीस्रोत संवर्धन आणि माती संवर्धन याबाबत निरीक्षण नोंदी केल्या. लांडोर खोरी परिसरातील नैसर्गिक संपदा पाहून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शिक्षकांनी निसर्ग संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत कचरा न फेकणे, झाडे लावणे व स्वच्छता राखणे याविषयी मार्गदर्शन केले.
संपूर्ण सहल शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून पर्यावरण शिक्षणाचे महत्त्व समजावे हा उद्देश यशस्वीपणे साध्य झाला.
ही सहल मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद व पालकांनी सहकार्य केले.




