
जळगाव, दि. 22 (जनसंवाद live): देशभरातील विविध राज्यांना जोडणारे रेल्वेमार्गाचे जाळे, विस्तारित अद्ययावत होत जाणारे राष्ट्रीय व राज्य महामार्गाची उपलब्धता तसेच देशातील मोठ्या अन महत्वाच्या महानगरांशी नातं जोडू पाहणारी विमानसेवा या दळणवळणाच्या त्रिस्तरीय संधीचा फायदा नव्या स्टार्टअपसाठी उद्योजकांना व्हावा म्हणून लीड बँकेकडून एमएसएमई मेगा क्रेडिट आऊटरीच चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा लीड बँक तथा सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने नविनतम स्टार्टअप उद्यम व्यासायिकांसाठी मार्गदर्शन व थेट अर्थसहाय्य देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात विविध उद्योजकीय प्रकल्पांसाठी एकूण 40 कोटींच्या कर्ज वितरणास मान्यता देण्यात आली. यावेळी उद्योगास सहाय्य्यभुत ठरणाऱ्या आर्थिक उभारणीबाबतच्या विविध योजना, पूरक सुविधा आणि एमएसएमई संबंधित इतर उत्पादने याविषयी प्रात्यक्षिकासह सविस्तर सादरीकरणही करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
मेगा आउटरीच कार्यक्रमास झोनल ऑफिसर डी. व्ही. कुमार, प्रादेशिक व्यवस्थापक रमेश जेठानी यांनी लीड बँकेचे कामकाज, आजवर राबविलेल्या उपक्रम आणि बाजारपेठीय पूरक ग्राहकाभिमुख उत्पादने यासंबंधी मार्गदर्शन केले. सेंट्रल बँक तथा लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर सुनीलकुमार दोहरे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्यासह या चर्चासत्रास सुमारे २०० व्यावसायिक, उद्योजक, स्टार्टअप प्रतिनिधी आणि उद्योगपती यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यशाळेत प्रातिनिधिक स्वरूपात सर्वश्री एनआयएफडीच्या अध्यक्ष संगीता पाटील, दाल मिल असोसिएशनचे सचिव आर. सी. जाजू, विनोद बियाणी, विकास महाले, रविंद्र लड्डा आदी मान्यवरांनी विचार-मंथन करत चर्चासत्रात सहभाग घेतला.
जिल्हाभरातील स्टार्टअप ईच्छुकांसाठी एमएसएमई मार्गदर्शनासाठी सेंट्रल बँकेचे मार्केटिंग ऑफिसर जतिन वालेचा यांच्याशी ९८२७३८९७९८ संपर्क साधावा असे आवाहन लीड बँक तथा सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आले आहे.





