समाजाला आरसा दाखविण्याची भूमिका पत्रकारांनी घ्यावी.- संदीप घोरपडे

जळगाव, दि.६ (जनसंवाद live): समाजाचे अध:पतन होत असून, आज पत्रकारांनी समाजाला आरसा दाखविण्याची भूमिका घ्यावी, असे विचार ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते, समाजसेवक संदीप घोरपडे यांनी मंगळवार दि. ६ रोजी पत्रकार भवन येथे व्यक्त केले. मराठी पत्रकार दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करीत होते. यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, कवयित्री बहिणाबाई विद्यापीठाच्या माध्यम प्रशाळेचे माजी संचालक डॉ. सुधीर भटकर होते.

श्री. घोरपडे पुढे म्हणाले, की समाजात गरीब व श्रीमंतांची दरी अधिकाधिक वाढत आहे. वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे, ही चिंताजनक बाब आहे. लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी ही पत्रकारांची आहे, असे सांगत पत्रकार भवनाच्या दुरुस्तीसाठी ५५ हजार ५५५ रुपयांची देणगी घोषित केली. प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
जिल्हा माहिती अधिकारी डॉ. ठाकूर सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविकात हिरक महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली.
यावेळी डॉ. भटकर म्हणाले, पारंपरिक पद्धतीने पत्रकारिता करण्याचे दिवस गेले आहे. आता नवीन तंत्रज्ञान, ‘एआय’चा वापर पत्रकारिता करताना वापर करणे गरजेचे आहे. समाजाला न्याय देण्याची भूमिका पत्रकारांनी घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
देविदास वाणी यांनी सूत्रसंचालन केले. अशोक भाटिया यांनी आभार मानले. भागवत पाटील यांनी पसायदान सादर केले. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार कमलाकर वाणी, अनंत वाणी, जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. आर. एल. हॉस्पिटल, रेडक्रॉस सोसायटी, मुक्ती फाउंडेशन, सारंग भाटीया, ॲड. रजनीश राणे, तेजमल जैन, ॲड. विश्वासराव भोसले, मुकुंद गोसावी, डॉ. नितीन धांडे आदींनी सहकार्य केले.



