प्रभाग १३ मध्ये प्रफुल्ल देवकरांच्या रॅलीस चांगला प्रतिसाद

जळगाव, दि. ११(जनसंवाद live): महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मध्ये राजकीय वातावरण तापत असले, तरी नागरिकांचा कल भावनिक आवाहनांपेक्षा शाश्वत विकासाकडे अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. अपक्ष उमेदवार प्रचारात मतदारांच्या भावनांना हात घालणारी भाषणे करत असताना, स्थानिक नागरिक मात्र मूलभूत सुविधा, दीर्घकालीन नियोजन आणि भक्कम विकास यावर भर देताना दिसत आहेत.
प्रभागातील महायुतीचे उमेदवार प्रफुल्ल गुलाबराव देवकर, नितीन प्रभाकर सपके आणि सुरेखा नितीन तायडे यांनी प्रचारादरम्यान संवाद साधल्यानंतर नागरिकांनी रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य सेवा आणि सार्वजनिक सोयीसुविधा यांसारख्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त केली.
केवळ आश्वासनांवर किंवा भावनिक मुद्द्यांनी हुरळून जाऊन मत न देता, प्रत्यक्ष काम केल्याचा आणि विकासाचा ठोस आराखडा मांडल्याचा दावा महायुतीच्या उमेदवारांनी केला आहे.
त्याला स्थानिक नागरिकांकडून प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. विशेषतः तरुण मतदारांमध्ये शिक्षण, रोजगाराची संधी, डिजिटल सुविधा आणि पर्यावरणपूरक विकास याबाबत जागरूकता वाढल्याचे दिसून आले.
प्रभाग क्रमांक १३ मध्ये काही अपक्ष उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर महायुतीचे उमेदवार रिंगणात आहेत. रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा आणि विकास कामांसाठी निधी उपलब्धतेचा प्रश्न लक्षात घेता, सत्तेसोबत असलेले प्रतिनिधित्वच प्रभावी ठरेल, असा दावा महायुतीकडून केला जात आहे. एकूणच प्रभाग १३ मधील जनमानस हे परिपक्व आणि भविष्याचा विचार करणारे असून, भावनिक आवाहनांपेक्षा शाश्वत व सर्वसमावेशक विकासाला पसंती देण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे.




