
जळगाव, दि. ४ (जनसंवाद live): संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात वीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना ‘तानाजी’ हा प्रेरणादायी ऐतिहासिक चित्रपट दाखविण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी तानाजींच्या शौर्यगाथेचा संक्षिप्त आढावा घेत विद्यार्थ्यांना स्वराज्य, देशभक्ती आणि त्याग यांचे महत्त्व पटवून दिले.
चित्रपटातून विद्यार्थ्यांना इतिहासाची ओळख तर झालीच, पण त्याचबरोबर राष्ट्रप्रेम, धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा यांचे प्रेरणादायी संदेशही मिळाले.
मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, अशा ऐतिहासिक चित्रपटांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना दृढ होते आणि आपल्या इतिहासाबद्दल अभिमान निर्माण होतो.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पर्यवेक्षक निलेश पवार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.




