Breaking
आरोग्यजळगावताज्या बातम्याराजकीय

महापौर दीपमाला काळे यांची आरोग्य कार्यालयाची अचानक तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

जळगाव, दि.१६ (जनसंवाद live): शहराच्या स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम देत जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी आज सोमवारी दि. १६ फेब्रुवारी पहाटे ७ वाजेच्या सुमारास प्रभाग क्रमांक ५ मधील आरोग्य विभागाच्या कार्यालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या हजेरी पुस्तकाची तपासणी करत गैरहजर आणि बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

पहाटे सहा वाजता महापौरांनी थेट आरोग्य विभागाच्या कार्यालयात एन्ट्री केल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. महापौरांनी हजेरी पुस्तकाची तपासणी केली. पटावर किती कर्मचारी आहेत आणि प्रत्यक्ष कामावर किती हजर आहेत, याची सविस्तर माहिती त्यांनी घेतली.

“जे कर्मचारी कामात कसूर करत असतील किंवा विनापरवाना गैरहजर राहत असतील, त्यांची वेळीच नोंद घ्या. कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त असणे गरजेचे आहे. जर कर्मचारी बेशिस्त वागत असतील, तर त्यांना तात्काळ शिस्त लावा, अन्यथा मला कठोर भूमिका घ्यावी लागेल,” अशा शब्दांत महापौरांनी उपस्थित अधिकाऱ्यांना खडसावले.

व्यापारी संकुलांमधील अस्वच्छतेवरून संताप
प्रभाग ५ मधील विविध व्यापारी संकुलांमध्ये (मार्केट) नियमित साफसफाई होत नसल्याच्या तक्रारी महापौरांकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रत्यक्ष परिसरात फिरून स्वच्छतेची पाहणी केली. “मार्केटची स्वच्छता नियमित झालीच पाहिजे. व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्या,” अशा सूचना त्यांनी दिल्या. या पाहणी दौऱ्यावेळी प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा गटनेते विष्णू भंगाळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, मंगला चौधरी, महेश पाटील यांच्यासह महापालिकेचे इतर पदाधिकारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button