Breaking
जळगावसामाजिक

बोरखेडा येथे कौतुकास्पद कामगिरी, मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत लोकसहभागातून वनराई बंधारा

चाळीसगाव, दि. 7 (जनसंवाद live): मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामविकास व जलसंधारणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत बोरखेडा खु. (ता. चाळीसगाव) ग्रामपंचायतीत महिला, बालिका पंचायत तसेच ग्रामस्थांच्या सक्रीय सहभागातून “वनराई बंधारा” बांधकामाचे कार्य उत्साहात पार पडले. जळगाव जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्यास चाळीसगाव तालुक्यातून सुरुवात झाली आहे. दरम्यान या कौतुकास्पद कामगिरी बद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी गटविकास अधिकारी अन्सार शेख यांच्यासह बोरखेडा येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना विशेष आमंत्रित करून सत्कार केला.

दिनांक ०५ ऑक्टोबर २०२५ रोजी ग्रामपंचायत हद्दीतील बोरखेडा शिवारातील कोल्हया नाल्यावर श्रमदानाच्या माध्यमातून हा बंधारा उभारण्यात आला. या कार्यात सरपंच सौ. वंदनाताई गुलाब पाटील, उपसरपंच सौ. मोहिनी संदीप चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य श्री. साहेबराव नाना पाटील, पोलीस पाटील श्री. शरद धर्मा पाटील, ग्रामपंचायत अधिकारी सौ. सविता पांडे, अंगणवाडी सेविका कलाताई निकम, आशा सेविका चंद्रकला सोनवणे, महिला बचतगट सी.आर.पी. सौ. अनिता चव्हाण यांच्यासह महिला बचतगटातील सर्व महिला, युवक मंडळ सदस्य व ग्रामस्थ यांनी एकजुटीने श्रमदान केले.

या उपक्रमामुळे परिसरातील जलसंधारण कार्याला चालना मिळून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याचा लाभ होणार असून भूजलपातळी वाढण्यास मदत होईल. विशेष म्हणजे, या बंधाऱ्याच्या बांधकामासाठी कोणताही शासकीय निधी न वापरता ग्रामस्थांच्या स्वयंप्रेरणा आणि लोकसहभागातून हे कार्य यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे.

हा उपक्रम “मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान” अंतर्गत ग्रामस्थांच्या एकजुटीचे आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button