अवैध काॅल सेंटर प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हेंसह आठ संशयीतांना पाच दिवसाची पोलीस कोठडी

जळगाव, दि. 29 (जनसंवाद live): ममुराबाद रोडवरील एल. के. फार्म हाऊसवर जळगाव पोलीसांनी रविवारी दि. 28 रोजी छापा टाकून ललित विजयराव कोल्हे (रा. कोल्हेनगर, जळगाव), नरेंद्र चंदू अगारिया, राकेश चंदू अगारिया, शाहबाज आलम, शाकिब आलम (चौघे रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) जिशान नुरी, हाशिर रशिद यांच्यासह स्वयंपाकी व गुन्ह्यात सहभागी अलीभाई याला अटक केली होती. नितीन गणापुरे यांनी अटकेतील संशयितांना सोमवारी दि. 29 रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास न्या. एम.एम. निकम यांच्या न्यायालयात हजर केले. गुन्ह्याचे गांभीर्य आणि व्याप्ती त्यांनी आपल्या युक्तिवादातून मांडली.
संशयितांकडून व्हच्र्युअल कॉल सेंटरच्या माध्यमातून इंग्लड, अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये संपर्क करून त्यांची ऑनलाइन विदेशी मुद्रेत फसवणूक करण्यात येत होती असे तपास अधिकारी नितीन गणापुरे यांनी न्यायालयात सांगीतले. डॉलर, क्रिप्टो करन्सी नंतर हवालाच्या मध्यमातून ही सर्व रक्कम वळती करण्याचा ‘सेट अप’ तेथे लावण्यात आला होता. मुंबईत बसलेले अकबर, आदिल, इम्रान असे तिघाच्या हाताखाली जवळपास २५ तरुण येथे या कामासाठी जुंपण्यात आले होते. पश्चिम बंगाल, राजस्थान आणि महाराष्ट्र अशा तीन राज्यात या गुन्ह्यांची व्याप्ती आहे. ललित कोल्हे याचे गुन्ह्याचा मास्टरमाइंड राकेश याच्यासोबत अनेकदा बोलणे सुरू होते. या संशयितांची राहण्या खाण्याची सोय कोल्हे यांनी बुक केलेल्या हॉटेलमध्ये करण्यात आली होती. केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने इगतपुरी येथे टाकलेल्या छाप्याप्रमाणे, याही गुन्ह्यात संघटीत गुन्हेगारीचा प्रकार आहे. फरार संशयितांचा शोध घेणे, परदेशी नागरिकांचा डाटा कोठून मिळवला, किती लोकांची फसवणूक केली, याचा शोध घेण्यासाठी दहा दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी केली.
युक्तिवाद ऐकण्यासाठी न्यायालयात मोठी गर्दी झाली होती. संशयितांच्या बाजूने अॅड. सागर चित्रे, अॅड. मुकेश शिंपी, अॅड. अकिल इस्माईल यांनी काम पाहिले तर सरकारपक्षातर्फे अॅड. वळवी यांनी बाजू मांडली.



