Breaking
कृषीजळगाव

जळगावात उद्यापासून ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन! शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान, ड्रोन आणि ई-स्कूटर जिंकण्याची संधी!

जळगाव, दि. 20 (जनसंवाद live): कृषी विस्तार क्षेत्रात गेल्या ११ वर्षांपासून कार्यरत असलेल्या ॲग्रोवर्ल्ड तर्फे जळगाव शहरात उद्यापासून (२१ नोव्हेंबर) चार दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. एकलव्य क्रीडा संकुल येथे २१ ते २४ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या ११ व्या प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारे नवतंत्रज्ञान, हायटेक फार्मिंग आणि शेतीत मजुरीला पर्याय ठरतील अशा ड्रोन, लहान-मोठे शेती यंत्र व अवजारांवर विशेष भर देण्यात आला आहे.

२१० हून अधिक स्टॉल्सचे आकर्षण..
या प्रदर्शनात २१० पेक्षा अधिक स्टॉल्स असून, त्यापैकी सुमारे ४५ स्टॉल्स लहानमोठी कृषी यंत्रे व अवजार असणार आहेत. बदलते हवामान, मजूर टंचाई, अद्ययावत तंत्रज्ञान, करार शेती आणि कमी पाण्यात येणारी पिके अशा आजच्या गरजेवर आधारित मांडणी हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे.

एकाच छताखाली मिळणार उपयुक्त माहिती..
शेतकऱ्यांना विविध पिकांतील कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, परसबाग/टेरेस गार्डनसाठी रोप (नर्सरी), फळे-भाजीपाल्याच्या नर्सरी, सोलर फार्मिंग, झटका मशीन, फवारणीसाठी ड्रोन, तसेच बँक, शासकीय विभाग आणि अनुदानाबाबतची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. टिशूकल्चर केळीच्या कंपन्या आणि किचन गार्डन टूल्सचे स्टॉल्सही यात समाविष्ट आहेत. कमी पाण्यात, कमी श्रमात आणि हमीचे उत्पन्न देणाऱ्या अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शनही येथे उपलब्ध असेल.

बक्षिसांची लयलूट आणि मोफत बियाणे..
या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आकर्षक बक्षिसांची संधी आहे. निर्मल सीडसतर्फे पहिल्याच दिवशी, म्हणजे २१ नोव्हेंबरला, पहिल्या पाच हजार जणांना किचन गार्डन बियाणे पाकीट मोफत वितरित केले जाणार आहे. याव्यतिरिक्त, रोज शंभरपेक्षाही अधिक जणांना लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसे जिंकता येतील. तसेच, सिका ई-मोटर्सतर्फे ई-स्कूटरचे बंपर बक्षीस जिंकण्याचीही सुवर्णसंधी उपलब्ध आहे. ​ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी या आधुनिक कृषी प्रदर्शन आणि यंत्र-अवजारे प्रदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button