वीर सावरकर रिक्षा युनियन तर्फे बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रध्दांजली

जळगाव, दि.९ (जनसंवाद live): ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकऱ्यांचे नेते डाॅ. बाबा आढाव (वय ९५) यांचे सोमवारी रात्री निधन झाले. हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांच्या न्यायासाठी लढणारे श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ ही त्यांची ओळख होती. त्यांच्यामागे पत्नी शीला आढाव, असीम आणि अंबर हे दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. फुफ्फुसात बिघाड झाल्याने डॉ. बाबा आढाव यांच्यावर गेल्या दहा दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना कृत्रिम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. मात्र, वयोमानामुळे त्यांची प्रकृती उपचारांना पुरेसा प्रतिसाद देत नव्हती. उपचारांदरम्यान सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
वीर सावरकर रिक्षा युनियन जळगांव व कृती समिती महाराष्ट्र च्या वतीने मंगळवारी शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जळगांव मधील हमाल बांधकाम मजूर आणि बहुसंख्येने रिक्षा चालक मालक उपस्थित होते. त्यांच्या जाण्याने कष्टकरी ,हमाल, रिक्षा चालक , सर्वसामान्य नागरिक आणि चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे असे मत दिलीप सपकाळे यांनी व्यक्त केले. डाॅ. बाबा आढाव यांच्या सोबतच्या आंदोलनाच्या आठवनींना सुद्धा त्यांनी उजाळा दिला.
बाबा आढाव यांचा जन्म १ जून १९३० रोजी पुण्यात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण महापालिका शाळेत तर, शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले. रसायनशास्त्राची पदवी संपादन करून त्यांनी ताराचंद रामनाथ आयुर्वेद महाविद्यालयातून १९५२ मध्ये पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी नाना पेठेतील घरी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.



