Breaking
जळगावताज्या बातम्यासांस्कृतिक

बालगंधर्व संगीत महोत्सवाला सुरूवात, पहिले पुष्प शास्त्रीय गायन व सतार वाद्याने गुंफले

जळगाव दि. ९ (जनसंवाद live): शास्त्रीय गायन व सतार वादनाने जळगावकर रसिक श्रोते बालगंधर्व संगीत महोत्सवात मंत्रमुग्ध झाले. छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात येथील स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या २४ व्या अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतिश मदाने, जैन इरिगेशनचे वरिष्ठ अधिकारी व्ही. एम.भट, सौ.सीमा भोळे या मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी स्व. वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुळकर्णी, उपाध्यक्षा दिपिका चांदोरकर आणि दीपक चांदोरकर यांची उपस्थिती होती.
आरंभी दीपक चांदोरकर यांनी गुरू वंदना सादर केली तर नुपूर खटावकर चांदोरकर दिग्दर्शन केलेले गणेश वंदना नृत्य सादर केले. गायिका श्रुती बुजरबरुआ गोडबोले यांचा सत्कार दीपिका चांदोरकर यांनी केला तर तबल्याची साथ संगत करणारे रोहित देव, तसेच संवादिनीवर संगत करणारे अभिनव रवंदे व तानपुरावर साथ करणाऱ्या अनघा नाईक गोडबोले आणि संपदा छापेकर यांचा सत्कार डॉ. देविदास सरोदे, डॉ. हरणखेडकर यांनी केले.

पहिल्या दिवसाच्या प्रथम सत्रात श्रुती बुजरबरुआ गोडबोले यांनी आपली कला सादर केली. राग यमनने सुरवात केली. तिने बडा ख्याल “बरनन कैसे करू मै गुरु के ग्यान” हा विलंबित एकतालात निबध्द ख्याल सादर केला. छोटा खालचे बोल “करत बरं जोडी ना माने श्याम रे” हा तीन तालात निबद्ध छोटा ख्याल सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. त्यानंतर स्वरचित बंदिश “हे गणेश गणनायक” ही एकतालातील रचना सादर केली. त्यानंतर “झाले युवती मना दारुण ऋण रुचिर प्रेम असे” हे नाट्यपद सादर केले. पं. भीमसेन जोशींनी अजरामर केलेले कर्नाटकी भजन “भाग्यदा लक्ष्मी बारम्मा” सादर करून रसिकांची वाहवा मिळविली.शुद्ध शास्त्रीय संगीताबरोबरच ठुमरी, दादरा, मराठी अभंग, भजन, गझल इत्यादी उपशास्त्रीय संगीतप्रकारांमध्येही सुमधुर स्वरांची छटा उलगडल्या.

प्रथम दिनाच्या द्वितीय सत्रात चिराग कट्टी यांचे सतार वादन झाले. चिराग कट्टी हे आजच्या काळातील भारतीय शास्त्रीय संगीतातील अत्यंत प्रतिभावान व आशादायी तरुण सतारवादक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपली कला सादर केली. २४ व्या महोत्सवाच्या प्रथम दिनाचे द्वितीय सत्र अक्षरशः गाजवले ते चिराग कट्टी यांच्या सतारवादनाने. चिरागबरोबर तितकीच दमदार तबल्याची अमेरिका स्थित विवेक पंड्या यांनी केली. चिराग ने आपल्या मैफिलीची सुरवात बागेश्री रागाने केली. यामध्ये सुरवातीला जोड आणि झाला तीन तलात निबद्ध होता. ह्या सादरीकरणामुळे रसिकांची दाद मिळविली. त्यानंतर चिराग यांनी खमाज रागातील एक बंदिश व पिलू रागातील एक रचना सादर केली.

महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व संस्कृती मंत्रालय भारत सरकार, रतनलाल सी बाफना ज्वेलर्स असून सुहान्स केमिकल्स प्रा. लि., दाल परीवार, वेगा केमिकल्स प्रा. लि. न्युबो टेक्नॉलॉजीस, चांदोरकर टेक्नॉलॉजीस प्रा. लि. यांचेही सहकार्य असणार आहे. भारतीय अभिजात संगीताच्या विश्वात जळगावचे नाव अधोरेखित करणाऱ्या या महोत्सवात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंतांना प्रतिष्ठानाने निमंत्रित करण्यात आले आहे.

१० जानेवारीला सारंगी वादनासोबत कथक जुगलबंदी.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्रथम सत्र उस्ताद सबीर खान सारंगी वादन करतील. “द्वितीय सत्रात निधी प्रभू व कुणाल ओम यांची कथक – फ्लेमेंको जुगलबंदी सादर करणार आहेत. उत्तर भारतातील कथक नृत्य, राजस्थानचे लोकसंगीत, सूफी आणि कव्वाली यांच्यासोबत केलेली त्यांची फ्लामेन्को संमिश्र सादरीकरणे ही त्यांच्या अद्वितीय संकल्पना असून, अशा प्रकारचे सांस्कृतिक फ्युजन आणि मनोरंजन सादर करणारे ते जगातील पहिले भारतीय कलाकार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button