जळगाव जिल्ह्यात आज पासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानास सुरुवात

जळगाव, दि.16 (जनसंवाद live): राज्य शासनाच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील एकूण 1160 ग्रामपंचायती सहभागी होणार आहेत. आज बुधवार पासून या अभियानाला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायात पातळीवर आज बुधवार दि. 17 रोजी एकाच वेळी ग्रामसभा घेण्यात येणार आहे.
अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, या उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग नोंदविणाऱ्या ग्रामपंचायतींना बहुस्तरीय बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या अभियानाचा शुभारंभ बुधवार दि. 17 सप्टेंबर रोजी करण्यात येणार असून, त्याआधी या अभियानाच्या प्रचार-प्रसारासाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे उद्घाटन मंगळवार दि. 16 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या इमारतीत करण्यात आले. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भाऊसाहेब अकलाडे उपस्थित होते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळून जिल्ह्यातील ग्रामविकास कार्य अधिक प्रभावीपणे पुढे जाणार असल्याचा विश्वास जिल्हा परिषद प्रशासनाने व्यक्त केला आहे.




