
जळगाव, दि. 24 (जनसंवाद live): महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती व सकल बौद्ध समाज तर्फे 22 सप्टेंबर रोजी खासदार श्रीमती स्मिता वाघ यांना भारतीय रेल्वेला “संविधान एक्सप्रेस” नाव मिळावं या विषयावर निवेदन देण्यात आलं. 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस दरवर्षी भारतात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने येणाऱ्या संविधान दिवसाला 76 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष सपकाळे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले.

ज्या संविधानाने संपूर्ण भारत चालतो त्या संविधानाचे नाव भारतीय रेल्वेला द्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. भारतात अजून एकाही रेल्वेला संविधान एक्सप्रेस हे नाव देण्यात आलेले नाही. येणाऱ्या 26 नोव्हेंबर रोजी संविधानाला 76 वर्ष पूर्ण होत असून या 76 व्या वर्षी रेल्वेला “संविधान एक्सप्रेस” नाव मिळावं यासाठी सकल बौद्ध समाज तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती जळगाव तर्फे निवेदन दिले. श्रीमती स्मिताताई वाघ यांनी याबद्दल हिवाळी अधिवेशनात हा विषय मार्गी लावू असे आश्वासित केले. यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष सपकाळे, आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, सचिव तृषाल सोनवणे, विजय सुरवाडे, कार्याध्यक्ष सचिन सरकटे, उपाध्यक्ष भारतीताई रंधे, नीलू इंगळे, राजू डोंगरे, प्रकाश सोनवणे, अॅड. अभिजीत रंधे, समस्त समाज बांधव उपस्थित होते.



