केळी संशोधन केंद्र, जळगाव येथे ‘केळी दिवस व शिवार फेरी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगाव, दि.४ (जनसंवाद live): महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंर्तगत केळी संशोधन केंद्र, जळगाव येथे फुले कृषी महोत्सव २०२६ अंतर्गत ‘केळी दिवस व शिवार फेरी’ हा कार्यक्रम मंगळवार दि.०३ रोजी उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्वप्रथम शिवार फेरीव्दारे केळी वरील सुरू असलेल्या विविध संशोधन प्रयोगाची पाहणी करण्यात आली. शिवार फेरीमुळे शेतक-यांना प्रत्यक्ष अनुभवातून तांत्रिक माहिती मिळाली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्यानविद्यावेत्ता, केळी संशोधन केंद्र, जळगावचे डॉ. अरूण भोसले यांनी विविध प्रयोग, देशी वाण, खत व्यवस्थापन व रोगव्यवस्थापन या विषयी सविस्तर माहिती दिली.

सदर कार्यक्रम प्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू मा. डॉ. विलास खर्चे हे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना केळी पिकातील सुधारित लागवड पध्दती, रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन, उत्पादन खर्च कमी करून उपन्न वाढविण्याच्या शिफारशी तसेच नविन संशोधन निकषावर आधारित प्रयोगाची आखणी इत्यादी बाबींवर भर दिला.
केळी पिकामधील विविध तज्ञांनी कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. उल्हास सुर्वे, कृषि विद्यावेत्ता यांनी कार्यक्रमात केळीसाठी जमीन आरोग्य व्यवस्थापन या विषयी शेतकऱ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच डॉ. सुनिल कदम, विभाग प्रमुख, कृषी अभियांत्रिकी विभाग यांना निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी कृत्रिम बुध्दीमत्ता (AI) व ड्रोन वापर यांविषयीचे प्रगत तंत्रज्ञान बद्दल सखोल माहिती दिली. डॉ. विक्रम कड यांनी केळी प्रक्रिया व उत्पादने यांवर मार्गदर्शन केले. डॉ. के. बी. पाटील, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. जळगाव यांनी निर्यातक्षम केळी लागवडीतील आव्हाने व उपाय याविषयी माहिती देऊन अधोरेखित केले. श्री. कुरबान तडवी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी जळगाव जिल्हयातील केळी पिकाची सद्यास्थिती व निर्यात आकडेवारी यांविषयी शेतकऱ्यांना अवगत करून केळीच्या विविध उत्पादनाविषयी सखोल माहिती दिली.

सदर कार्यक्रमासाठी केळी शेतकरी शास्त्रज्ञ मंचचे अध्यक्ष श्री. संदिप पाटिल, उपाध्यक्ष श्री. विनोद बोरसे यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच केळी संशोधन केंद्राचे प्रा. अंजली मेंढे, डॉ. विजयराज गुजर, श्री. चंद्रशेखर गुळवे, डॉ. नितिन सातपुते, डॉ. प्राजक्ता वाघ, श्री. विनोद लंगोटे, श्री. आकाश वसाने, व दिपीका मोरे यांनी परिश्रम घेतले. आधुनिक केळी लागवड घडीपत्रिका, संशोधन पुस्तिका, केळीवरिल करपा, पनामा व कुकंबर मोॉक व्हायरस (सीएमव्ही) इ. प्रसिध्द करण्यात आल्या. आदर्श शेतकरी पुरस्कार देण्यात आले त्यात सेंद्रीय शेती करणारे, निर्यातदार शेतकरी यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
तांत्रिक सत्रामध्ये विविध विषयावर चर्चा होऊन केळी पिकातील भविष्यातील आव्हाने व संधी, केळी पिकातील निर्यातक्षम उत्पादन, पनामा रोग व्यवस्थापन व त्याचे समूळ उच्चाटन, केळी प्रकिया उद्योग संधी व भविष्यातील आव्हाने, केळी उत्पादनासाठी कृत्रिम बुध्दिमत्ता (AI) चा वापर या विषयांवर विस्तृत चर्चा होऊन पुढील दिशा ठरविण्यात आली.
डॉ. गोरक्ष ससाणे, संचालक विस्तार शिक्षण, मफुकृवि, राहुरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सहयोगी अधिष्ठाता धुळे, नंदुरबार व मुक्ताईनगर अनुक्रमे डॉ.बी.एम. इल्ले, डॉ.यु.बी.हुले, डॉ. संदिप पाटील हे उपस्थित होते तसेच डॉ. दिपक दहाट, प्रमुख शास्त्रज्ञ, तेसंके, जळगाव, डॉ. हेमंत बाहेती, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, जळगाव, डॉ. योगेश्वर पाटील, कृतंवि, जळगाव हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातून ४०० शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. वैभव सुर्यवंशी, कृषि अभियांत्रिकी विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, जळगाव तसेच श्री. चंद्रशेखर गुळवे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.




