विठ्ठलपेठ मध्ये तीन घरांना आग, मुलीच्या उपचारासाठी साठवलेली सर्व जमापुंजी जळून खाक

जळगाव, दि.१५ (जनसंवाद live): जुने जळगावातील विठ्ठल पेठ मध्ये तीन घरांना आग लागुन घरातील सर्व वस्तु जळून खाक झाले. हि आग आज दि.15 सकाळी साडे दहा ते अकराच्या सुमारास लागली. आग लागण्याचे कारण समजु शकले नाही. पांझरापोळ जवळील विठ्ठल पेठ मध्ये गणेश शंकर शिरसाळे, निलेश शंकर शिरसाळे, सुभद्राबाई दगडू कोळी यांचे शेजारी शेजारी घरे आहेत. तीनही घरे लाकडाची असल्याने आग लागताच घराने पेट घेतला.

गणेश शंकर शिरसाळे हे रिक्षा चालवतात. पत्नी मंदिरात गेल्याने घरी कोणी नव्हते. घरातून धुर निघत असल्याचे सुभद्राबाई कोळी यांना कळाले ते लगेच घरातून बाहेर आले. निलेश शिरसाळे यांच्या घरात लहान मुल खेळत होती तेही घराबाहेर पडली. घरात असलेल्या फ्रिजचा स्फोट झाल्याचे स्थानिक नागरीकांनी सांगीतले. क्षणार्धात घराने पेट घेतला आणि होत्याचे नव्हते झाले. गणेश शिरसाळे यांनी आपल्या मुलीच्या उपचारासाठी एक एक रूपया जमा केलेला होता. त्यांची मुलगी जयश्री हि आठ वर्षाची आहे. तीची उंची वाढत नसल्याने तीच्या उपचारासाठी ऐशी हजार रूपये जमा केले होते. तेही जळाल्याचे त्यांच्या पत्नीने सांगीतले. या आगीमध्ये शाळेची कागदपत्रे, धान्य, शासकीय कागद पत्रे (आधारकार्ड, रेशनकार्ड) इत्यादी जळून खाक झाली आहेत. रोज मजुरी करून पोट भरणारे कुटूंब सर्व जमा पुंजी आगीत भस्मसात झाल्याने हताश झाल्याचे दिसत होते.



