वंजारी युवा संघटनेतर्फे २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

जळगाव, दि.२६ (जनसंवाद live): जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटनेतर्फे आयोजित २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. विविध शैक्षणिक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या ११० गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुरेश राजाराम वराडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद चिंधू लाड (अधिव्याख्याता, शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव), रवींद्र पोळ (सेवानिवृत्त असिस्टंट), डॉ. विजय गरकल (बऱ्हाणपूर), डॉ. अश्विनी जायभाये, रमेश लाडवंजारी, श्रीराम मंदिर संस्था व समस्त वंजारी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, सहायक आयुक्त गणेश चाटे, रवींद्र सोनवणे (मुख्याधिकारी, नशिराबाद नगर परिषद), नगरसेविका निकिता लाडवंजारी उपस्थित होते. तसेच जामनेर येथील जिल्हा कार्यकारिणी सदस्य किशोर पाटील व मुक्ताईनगरचे देवानंद वंजारी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी डॉ. विजय गरकल यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, सातत्यपूर्ण परिश्रम, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि जीवनात मोठे ध्येय ठेवून यश संपादन करण्याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. सुरेश राजाराम वराडे यांनी सांगितले की, “आपल्या समाजात शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. आज गुणवंत विद्यार्थ्यांचा होत असलेला सन्मान हा भविष्यातील यशस्वी पिढी घडविण्याचा पाया आहे. आपल्या समाजातून केवळ एक-दोन नव्हे, तर शंभर तुकाराम मुंढे साहेबांसारखे प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख अधिकारी घडले पाहिजेत. त्यांनी आपल्या कार्यातून जसे समाजाचे आणि महाराष्ट्राचे नाव उंचावले, तसेच आपल्या विद्यार्थ्यांनीही उच्च शिक्षण घेऊन विविध प्रशासकीय सेवांमध्ये स्थान मिळवत समाजाचा आणि देशाचा गौरव वाढवावा. त्यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द, शिस्त, कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा या गुणांचा अंगीकार करणे आवश्यक आहे.”
कार्यक्रमात इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थिनी मोक्षदा राहुल लाडवंजारी व खुशबू भानुदास नाईक यांनी मनोगत व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले. समाजातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन रूपाली आव्हाड व प्रणाली नाईक यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाची सांगड त्यांनी ओघवत्या व आकर्षक शैलीत घालत कार्यक्रम अधिक रंगतदार केला.
समारोपप्रसंगी वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, पालक व समाजबांधवांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, डिजिटल युगाची कास धरत यंदा छापील निमंत्रण पत्रिकांऐवजी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून डिजिटल निमंत्रण देण्यात आले होते. या अभिनव उपक्रमाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व समाजबांधव उपस्थित राहिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष प्रशांत नाईक, उपाध्यक्ष नामदेव (भाऊ) वंजारी, सचिव महादू सोनवणे, सहसचिव उमेश वाघ, भानुदास नाईक, चंदुलाल सानप, नंदू वंजारी, रामेश्वर पाटील, विजय लाडवंजारी, संतोष घुगे, उमेश आंधळे, सुधीर नाईक तसेच वंजारी युवा संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि भगवान सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष मनोहर काळे, जामनेर तालुकाध्यक्ष गजानन घ्यार, बोदवड तालुकाध्यक्ष अजय पाटील, मार्गदर्शक किरण वंजारी, सरचिटणीस राहुल भिसे, मार्गदर्शक प्रदीप काळे, के. डी. वंजारी, देवा वंजारी, संदीप काळे, अतुल पाडर व इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, शिक्षणाला प्रोत्साहन आणि समाजातील नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा २४ वा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या संपन्न झाला.





