कोल्हापूर येथील सावली केअर सेंटरची ‘सावली’ आता जळगावच्या रुग्णांनाही मिळणार, जागेसाठी रेडक्रॉस कडून शोध सुरू

जळगाव, ११ (जनसंवाद live): बर्याच कुटुंबामध्ये वयोवृद्ध माणसे असतात, त्यांच्या आजारपणात त्यांची काळजी घेणारे कोणी नसते. घरातील सर्व मंडळी नोकरी करत असल्याने वयोवृद्ध रुग्णाची काळजी घ्यायला त्यांना वेळ मिळत नाही. पैसे असतात पण त्या रुग्णाची काळजी घेणार अस कोणी नसत. अशांसाठी किशोर देशपांडे यांनी कोल्हापूर येथे २२ वर्षापुर्वी सावली केअर सेंटर सुरू केले. आता कोल्हापूर मध्ये त्यांच्या तीन शाखा असुन इतर जिल्ह्यात सुध्दा तीन शाखा आहेत. आता जळगाव मध्ये शाखा सुरू करू इच्छीत असुन जळगावच्या इंडीयन रेडक्रॉस सोयटीच्या माध्यमातून त्यांचा जागेचा शोध सुरू आहे.
हि संस्था सरकारकडून एक रुपया न घेता अगदी कमी दरामध्ये रूग्णाची काळजी घेत असते. रूग्णाची जी परीस्थीती आहे म्हणजे श्रीमंत, मध्यमवर्गीय, आणि गरीब त्याप्रमाणे त्या रुग्णाकडून फी आकारून काळजी घेतली जाते. असे सावली केअर सेंटरचे संस्थापक किशोर देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.
जळगावमधील केंद्राची उभारणी स्वतंत्रपणे करण्यात येणार असली तरी कोल्हापूर येथील सावली केअर सेंटरचे संस्थापक किशोर देशपांडे यांचे मार्गदर्शन आणि आवश्यक ते सहकार्य घेण्यात येणार आहे.
कोल्हापूरच्या केंद्राच्या दीर्घ अनुभवाचा उपयोग जळगावमध्ये रुग्णसेवेची कार्यपद्धती, कर्मचारी प्रशिक्षण, प्रशासन, रुग्णांच्या गरजा, भोजन व्यवस्था आणि अन्य बाबींचे नियोजन करताना केला जाणार आहे.
रेडक्रॉसकडून नागरिकांना आवाहनः
‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर’ हा केवळ एक केअर सेंटर उभारण्याचा उपक्रम नसून, ज्या कुटुंबांना दीर्घकाळ परावलंबी रुग्णांची सेवा करणे कठीण जाते, त्यांच्यासाठी आधार व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
त्यामुळे जळगाव शहरातील दानशूर नागरिक, बंगला व इमारत मालक, उद्योग समूह, सामाजिक संस्था आणि सीएसआरच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या कंपन्यांनी या उपक्रमासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपला रिकामा बंगला तीन वर्षांसाठी सामाजिक सेवेला देणे म्हणजे एका कुटुंबाला नव्हे, तर अनेक परावलंबी रुग्णांना सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जीवन देण्यासाठी हातभार लावणे होय, अशी भावना रेडक्रॉसच्या पदाधिकान्यांनी व्यक्त केली आहे.
‘रुग्णसेवा हीच मानवसेवा’:
जळगावमध्ये सुरू होणारे हे केंद्र रुग्णांना केवळ निवारा देणारे केंद्र न राहता वैद्यकीय शुश्रूषा, मानसिक आधार, पोषण, स्वच्छता, सुरक्षितता आणि मानवी सन्मान या सर्व बाबीचा समन्वय साधणारे केंद्र असावे, असा रेडक्रॉसचा प्रयत्न आहे.
‘रुग्णसेवा हीच मानवसेवा या भावनेतून उभारण्यात येणाऱ्या या उपक्रमाला जळगावकरांनी लोकसहभागातून बळ द्यावे, असे आवाहन इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा जळगावच्या वतीने करण्यात आले आहे.




