Breaking
जळगावताज्या बातम्याशैक्षणिक

पानांचा वापर करून विद्यार्थ्यांनी साकारले गणरायाचे रूप, कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांचा नाविण्यपूर्ण उपक्रम

जळगाव, दि. १९ (जनसंवाद live ): शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकातील धडे नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला आणि कलागुणांना वाव देणारा अनुभव असतो, याची प्रचिती मानव सेवा मंडळ, जळगाव संचलित प्राथमिक विद्या मंदिर, जळगाव येथे आली. ‘विना दप्तराची शाळा’ या उपक्रमांतर्गत इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांनी विविध झाडांच्या पानांपासून आकर्षक गणपती साकारत अनोखा कलाविष्कार घडविला. 

पिंपळाचे पान, जास्वंदीचे पान, अशोकाचे पान यांसह विविध झाडांची पाने वापरून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने गणपतीच्या सुंदर प्रतिकृती तयार केल्या. नैसर्गिक साधनसामग्रीचा कलात्मक पद्धतीने वापर करून गणपती साकारण्याचा हा अनुभव विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंददायी शाळा ही प्रेरणादायी ठरली.

या उपक्रमाचे प्रात्यक्षिक उपक्रमशील कलाशिक्षक,निसर्ग प्रेमी सुनिल दाभाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर करून दाखविले. पानांची निवड, त्यांची रचना, आकार आणि उपलब्ध नैसर्गिक साहित्याचा कलात्मक वापर याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘निसर्गातून कला आणि कलेतून आनंद’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

खेळ, गाणी आणि गोष्टींनी शाळेचा परिसर झाला आनंदमय

‘विना दप्तराची शाळा’ उपक्रमात इयत्ता १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ, गाणी, गोष्टी आणि मनोरंजक शैक्षणिक उपक्रम घेण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यापासून मुक्त वातावरणात आनंदाने शिकण्याची आणि व्यक्त होण्याची संधी मिळाली. खेळातून सहकार्य, गाण्यांतून आनंद, गोष्टींतून मूल्यशिक्षण आणि कलाकृतीतून सर्जनशीलता असा शिक्षणाचा बहुआयामी अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.असे शाळेचा मुख्याध्यापिका माया अंबटकर यांनी सांगितले.

👏 उपक्रमाचे झाले कौतुक

विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे मुख्याध्यापिका माया अंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील, माध्यमिक मुख्याध्यापिका अलका महाजन, मिरा चौधरी, वैशाली साळुंके, मनोजकुमार बावस्कर यांनी कौतुक केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलिया, मानद सचिव विश्वनाथ जोशी यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उपक्रमशील कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांच्या अभिनव उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

पुस्तकांबरोबरच निसर्ग, कला, खेळ आणि अनुभवातून शिक्षण देणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आणि त्यांच्या सर्जनशीलतेला नवी दिशा मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button