Breaking
जळगावताज्या बातम्याराजकारण

आमदार भोळेंनी राजीनामा द्यावा. – कुलभूषण पाटील, महापालिकेत भाजपमध्येच चार गट

जळगाव, दि. १९ (जनसंवाद live): आमदार सुरेश भोळे यांचे अधिकारी व महापालिकेतील पदाधिकारी ऐकत नाहीत. म्हणजे आमदार असूनही त्यांना अधिकाऱ्यांवर नियंत्रण मिळविता येत नसेल, तर आमदार भोळे यांनी आमदारपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख तथा माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

महापालिकेत सत्तेत असूनही भाजपमध्ये चार गट आहेत. एक गट म्हणतो स्वच्छतेसाठी वॉटर ग्रेस कंपनी आणा, दुसरा गट म्हणतो ‘बीव्हीजी’ आणा. म्हणजे सत्ताधाऱ्यांमध्येच एकता नाही. शहरातील स्वच्छता, पथदिवे, रस्त्यांसह आदी प्रश्नांचा बोजवारा उडाला असल्याचेही कुलभुषण पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, महिला महानगराध्यक्षा मनीषा पाटील उपस्थित होते. माजी उपमहापौर कुलभुषण पाटील म्हणाले की, महापालिकेत सत्ताधाऱ्यांमध्ये एकता नसल्याने शहरातील नागरीप्रश्नाचा खेळखंडोबा झाला आहे. नागरिकांना सुविधा मिळत नाही. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न, पथदिवे, पाणीपुरवठा, भुयारी गटारींसह अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे जळगावकरांची फरफट होत आहे.

महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांवर त्यांचे नियंत्रण नाही. एक गट म्हणतो स्वच्छतेसाठी वॉटर ग्रेसला आणा, दुसरा गट म्हणतो, बीव्हीजी आणा. काय चाललेय यांचे? यामागे काय गौंडबंगाल आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने मतांचा गैरप्रकार करून सत्ता मिळविली आहे.

शहरात आमदार भोळे दहा वर्षांपासून आमदार आहेत, एकतरी रस्ता दाखवावा, जो चांगला आहे. शहरातील एकही समांतर रस्ता पूर्ण झालेला नाही. गाळेधारकांकडून महसूल वसूली होत नाही. सत्ताधाऱ्यांचा गलथान कारभारामुळे जळगावकर जनता पूर्णता वेठीस धरली आहे. याविरोधात लवकरच मोठे आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष उभारणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button