प्रेस फोटोग्राफर फाउंडेशन तर्फे जागतिक छायाचित्रण दिन उत्साहात साजरा
आरोग्याची काळजी घेण्याचा महापौर दीपमाला काळे यांचा सल्ला

जळगाव, दि. १९ (जनसंवाद live): प्रेस फोटोग्राफर फाउंडेशन जळगाव तर्फे जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त शहरातील केमिस्ट भवन येथे आज विविध उपक्रमांसह छायाचित्रण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यांचे विधिवत पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाला जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, जैन उद्योग समूहाच्या मीडिया विभागाचे प्रमुख अनिल जोशी, कॉन्ट्रॅक्टर संभाजीराव जाधव तसेच प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे अध्यक्ष संधिपाल वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते. जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त उपस्थित सर्व छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घ्या : महापौर दीपमाला काळे
यावेळी बोलताना महापौर दीपमाला काळे म्हणाल्या की, “धकाधकीच्या जीवनात छायाचित्रकारांची धावपळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विविध कार्यक्रम, घटना आणि बातम्यांच्या कव्हरेजसाठी छायाचित्रकार सतत धावत असतात. त्यामुळे प्रत्येक छायाचित्रकाराने आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.”
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक आणि विधायक उपक्रमांना महापालिकेतर्फे वेळोवेळी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही महापौर दीपमाला काळे यांनी दिले. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुमित देशमुख, हेमंत पाटील जळगावकर, अभिजीत पाटील, सचिन पाटील, अरुण इंगळे, प्रकाश लिंगायत, जुगल पाटील, पांडुरंग महाले, भूषण पाटील, धर्मेंद्र राजपूत, भूषण हंसकर, गोकुळ सोनार, आबा मकासरे, नितीन सोनवणे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत पाटील यांनी केले. यावेळी शहरातील आजी-माजी वृत्तपत्र छायाचित्रकार, डिजिटल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी तसेच शहरातील व्यावसायिक छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.




