Breaking
जळगावताज्या बातम्या

नवनिर्वाचित नगरसेवक व अधिकाऱ्यांसाठी जळगाव महापालिकेत उद्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

प्रसिद्ध वक्ते दिपक करंजीकर करणार मार्गदर्शन

जळगाव, दि.२३ (जनसंवाद live): जळगाव शहर महानगरपालिकेचा कारभार अधिक लोकाभिमुख आणि प्रभावी व्हावा, या उद्देशाने महापौर दीपमाला काळे यांच्या संकल्पनेतून सर्व ७५ नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांसाठी एका विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन मंगळवारी दि. २४ रोजी सकाळी ११ वाजता मनपाच्या सभागृहात करण्यात आले आहे. या वर्गाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना महापालिकेच्या कामकाजाचे शास्त्रशुद्ध धडे दिले जाणार आहेत.

महापालिकेत प्रत्यक्ष कारभार कसा करावा, प्रशासकीय रचनेत नेमके किती विभाग असतात आणि प्रत्येक विभागाची जबाबदारी काय, याबाबात या प्रशिक्षण वर्गात सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. अनेकदा तांत्रिक माहितीच्या अभावामुळे लोकप्रतिनिधींना कामात अडचणी येतात, त्या दूर व्हाव्यात हा यामागचा मुख्य हेतू आहे.

सामान्य नागरिकांचे दैनंदिन प्रश्न कोणते आहेत आणि ते प्रश्न महासभेत किंवा प्रशासनासमोर मांडताना त्यातील कायदेशीर आणि तांत्रिक बाजू कशा तपासाव्यात, याबाबतही मार्गदर्शन केले जाईल. एखादा मुद्दा अभ्यासपूर्णरीतीने मांडल्यास तो निकाली काढणे कसे सोपे होते, याचे प्रशिक्षण यावेळी दिले जाणार आहे.

या प्रशिक्षण वर्गासाठी मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध वक्ते, लेखक, विश्लेषक आणि अर्थव्यवस्थेचे अभ्यासक दीपक करंजीकर उपस्थित राहणार आहेत. करंजीकर हे केवळ एक उत्तम वक्ते नसून त्यांना विविध विषयांचा सखोल व्यासंग आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे नगरसेवकांना प्रशासकीय आणि आर्थिक विषयांची मांडणी कशी करावी, याचे उत्तम ज्ञान मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या उपक्रमामुळे जळगाव महापालिकेच्या कामकाजात अधिक स्पष्टता आणि वेग येईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button