वंजारी समाजातर्फे २६ जुलै रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

जळगाव, दि. ८ (जनसंवाद live): समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्था, मेहरूण, जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटना व भगवान सेना यांच्या संयुक्त विद्यमाने २४ वा भव्य गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ रविवार, २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता लाडवंजारी समाज मंगल कार्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
यामध्ये दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थी, पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी, व्यावसायिक शिक्षण पूर्ण करणारे तसेच विविध शासकीय व निमशासकीय सेवेत निवड झालेल्या समाजबांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचाही गौरव केला जाणार आहे.
सत्कारासाठी पात्र विद्यार्थ्यांनी पासपोर्ट फोटो व गुणपत्रिकेची प्रत २० जुलैपर्यंत आपल्या गाव किंवा तालुका प्रतिनिधीकडे जमा करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यंदा पेपरलेस उपक्रमांतर्गत सर्व निमंत्रणे ऑनलाइन माध्यमातून देण्यात येत असून समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





