डम्पिंग ग्राऊंडच्या कामाला गती द्या; उपमहापौर व स्थायी समिती सभापतींचे प्रशासनाला निर्देश

जळगाव, दि.१० (जनसंवाद live): शहरातील डम्पिंग ग्राऊंडच्या धिम्या गतीने सुरू असलेल्या कामावर लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील, नगरसेविका जयश्री पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते गजानन मामा देशमुख यांनी आज कचरा डेपोच्या (डम्पिंग) कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.
पुण्यातील मोशी येथे डम्पिंग ग्राऊंडवर झालेली भीषण दुर्घटना आपल्याकडे घडू नये, यासाठी वेळीच खबरदारी घेण्याच्या आणि सुरक्षा उपाययोजना कडक करण्याच्या सूचना उपमहापौर व सभापतींनी उपस्थित मनपा प्रशासनाला व ठेकेदाराला दिल्या. तसेच अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या कामाचा तात्काळ वेग वाढवण्याचे सांगीतले.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात:
डम्पिंग ग्राऊंडच्या ठिकाणी कचऱ्याला लागणाऱ्या आगीमुळे आणि निघणाऱ्या विषारी धुरामुळे आजूबाजूच्या खेड्यांमधील तसेच मनपा क्षेत्रातील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या प्रदूषणाचा स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होत असून, परिसरात त्वचेचे विकार (स्किन इन्फेक्शन) आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे रुग्ण आढळून येत असल्याबद्दल लोकप्रतिनिधींनी तीव्र चिंता व संताप व्यक्त केला. नागरिकांच्या जिवाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला. पाहणी दरम्यान मनपाचे वरीष्ठ अधिकारी आणि संबंधित यंत्रणांचे प्रतिनीधी या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्यात लोकप्रतिनिधींसोबत उपस्थित होते.
नागरिकांनी आपल्या व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. प्रशासनाने कामात दिरंगाई न करता लवकरात लवकर नागरिकांना या त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली आहे.





