Breaking
जळगावताज्या बातम्याशैक्षणिक

जागतिक व्याघ्र दिनानिमित्त भव्य छायाचित्र प्रदर्शन संपन्न, ‘न्यु कन्झर्व्हर’ संस्थेचा पुढाकार. 

जळगाव, दि. ३ (जनसंवाद live): नुकत्याच 29 जुलै रोजी संपन्न झालेल्या जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून ‘न्यु कन्झर्व्हर’ संस्थेच्या वतीने शिव कॉलनीतील श्रीमती सुभद्रा लक्ष्मण चौधरी इंग्लिश मीडियम स्कूल (पर्यावरण शाळा) येथे आयोजित करण्यात आलेल्या आकर्षक वाघ छायाचित्र प्रदर्शनाचे दिमाखदार उद्घाटन वरिष्ठ पत्रकार व प्रमुख पाहुणे श्री. विजय पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी जळगाव जिल्ह्यातील ख्यातनाम छायाचित्रकार तसेच दैनिक सकाळचे फोटोजर्नलिस्ट संधिपाल वानखेडे, पर्यावरण शाळेच्या मुख्याध्यापिका चेतना नन्नावरे, ‘न्यु कन्झर्व्हर’ संस्थेचे चेअरमन अभय उजागरे, संस्थेचे पदाधिकारी शैलेंद्र महाजन, इम्रान तडवी , श्रीमती अर्चना उजागरे, तसेच शाळेतील सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. विजय पाठक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त आणि कर्तव्यपरायणता असणे किती महत्त्वाचे आहे, हे अतिशय सविस्तरपणे समजावून सांगितले. त्यानंतर बोलताना ‘न्यु कन्झर्व्हर’ संस्थेचे प्रेसिडेंट श्री. अभय उजागरे यांनी निसर्गचक्रात वाघाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व उपस्थितांना विशद करून सांगितले.

या प्रदर्शनात जळगाव, पुणे, मुंबई, बेंगळुरू आणि दुबई येथील प्रतिभावान वन्यजीव छायाचित्रकारांच्या ‘बीबीसी वाईल्डलाईफ’ आणि ‘नॅशनल जिओग्राफिक’मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुरस्कारप्राप्त अशा 50 हून अधिक उत्कृष्ट कलाकृती पाहायला मिळाल्या. अत्यंत आकर्षक असलेल्या या वन्यजीव छायाचित्रांचे दर्शन घेऊन उपस्थित विद्यार्थी आणि पालकांनी आनंद व्यक्त केला.

​मुलांमध्ये व पालकांमध्ये वन्यजीव संवर्धनाविषयी आवड निर्माण करणारी ही दुर्मिळ आणि समृद्ध करणारी पर्वणी ठरली असून, या प्रदर्शनाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button