Breaking
क्रिडाजळगावताज्या बातम्या

जळगाव प्रेस फोटोग्राफर संघ ठरला पत्रकार प्रीमियर लीग पर्व-२ चा विजेता, भुषण हंसकर मालिकावीर

जळगाव, दि.३० (जनसंवाद live): पत्रकारांनी पत्रकारांसाठी आयोजित केलेली महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा ‘पत्रकार प्रिमियर लीग’ पर्व-२ चा समारोप दि.२९ मार्च रोजी दिमाखात पार पडला. जळगाव प्रिंट मीडिया विरुद्ध जळगाव प्रेस फोटोग्राफर संघात खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात प्रेस फोटोग्राफर संघाने बाजी मारली. तृतीय क्रमांक प्रेस एडिटर संघाने पटकावला. सर्व संघांना आणि खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. संपूर्ण लीग मधे उत्कृष्ट खेळाच्या प्रदर्शनासाठी मालिकावीरचा पुरस्कार प्रेस फोटोग्राफर भूषण हंसकर यांना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

समाजाचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकार नेहमीच जीवाची बाजी लावत, ऊन, वारा, पाऊस, थंडी सहन करीत दिवसरात्र धावपळ करीत असतात. पत्रकारांच्या आरोग्य, मनोरंजनासाठी हाती घेतलेल्या पत्रकार प्रीमियर लीगचे दुसरे पर्व दि.२६ ते २९ मार्च दरम्यान सागर पार्क मैदान या ठिकाणी पार पडले.

२४ संघांचा सहभाग, चुरशीचे सामने
जिल्हाभरातील पत्रकारांना एकत्र करून, सर्व पत्रकार संघटनेच्या पाठींब्याने खेळल्या गेलेल्या स्पर्धेत जिल्ह्यातील पत्रकारांचे तालुकानिहाय १४, जळगाव शहरातील संघ, संपादक, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, डॉक्टर, पोलीस प्रशासन संघ असे २४ संघ सहभागी झाले होते. चार दिवसात अनेक चुरशीचे सामने पहावयास मिळाले. ६ षटकांच्या सामन्यात ९९ सर्वोच्च धावसंख्या तर २० सर्वात कमी धावसंख्या देखील प्रेक्षकांनी अनुभवली.

खेळाडू, प्रेक्षक, कुटुंबासाठी उत्तम व्यवस्था
चार दिवसीय स्पर्धेत जवळपास ५०० पेक्षा अधिक पत्रकारांनी सहभाग नोंदवला. खेळाडू पत्रकारांसाठी चार दिवस जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. तसेच खेळाडू, कुटुंबीय आणि प्रेक्षकांसाठी सरबत, पाणी आणि लाईव्ह प्रक्षेपणाची देखील व्यवस्था आयोजकांनी केली होती. स्पर्धेसाठी किशोर पाटील, वाल्मिक जोशी, प्रवीण सपकाळे, चेतन वाणी, जकी अहमद, भगवान सोनार, वसीम खान, सचिन गोसावी, राकेश वाणी, यामिनी कुलकर्णी यांच्यासह सर्व पत्रकार मित्रांनी परिश्रम घेतले.

मान्यवरांनी वाढवले प्रोत्साहन
चार दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत चार दिवसात टॉस करण्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आ.राजुमामा भोळे, आ.किशोर पाटील, महापौर दीपमाला काळे, धरणगाव नगराध्यक्षा लीलाबाई चौधरी, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ.चंद्रशेखर पाटील, जिल्हा दूध संघ संचालिका भैरवी वाघ-पलांडे, जिल्हाधिकारी डॉ.रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, प्रांताधिकारी विनय गोसावी, उद्योजिका शीतल बाक्षे, जिल्हा माहिती अधिकारी रविंद्र ठाकूर यांच्यासह संपादक आणि जेष्ठ पत्रकारांनी हजेरी लावली. सर्वच लोकप्रतिनिधी, मान्यवरांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

मुख्य चषक आणि सन्मानचिन्हांचे आकर्षण
स्पर्धेत उपउपांत्य फेरीत गतविजेता चाळीसगाव संघ, जळगाव प्रिंट मिडिया, जळगाव एडिटर, प्रेस फोटोग्राफर संघ पोहचले होते. अंतीम सामना जळगाव प्रिंट मीडिया विरुद्ध जळगाव प्रेस फोटोग्राफर संघात खेळला गेला. प्रेस फोटोग्राफर संघ द्वितीय पर्वाचा विजेता ठरला. तृतीय क्रमांक प्रेस एडिटर संघाने पटकावला. स्पर्धेत सहभागी सर्व संघाना, प्रत्येक सामन्यातील सलामीवीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, मालिकावीर यासह प्रथम, द्वितीय, तृतीय विजेत्या संघाला आकर्षक चषक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

मैत्रीपूर्ण सामन्यांनी वाढवली रंगत
शेवटच्या दिवशी सकाळच्या सत्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय असा सामना रंगला. प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्या नेतृत्वात संघाने विजय मिळवला. त्यांनतर जिल्हाधिकारी कार्यालय विरुद्ध पोलीस अधीक्षक कार्यालय सामन्यात पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वात संघाने विजय मिळविला. आयोजन समिती विरुद्ध पोलीस अधीक्षक कार्यालय सामन्यात पोलीस अधीक्षक संघाने विजय मिळवला. अधिकारी, कर्मचारी खेळत असल्याने सामन्यात चांगलीच रंगत पाहायला मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button