Breaking
जळगावताज्या बातम्या

अनधिकृत हॉकर्सवर तत्काळ कारवाई करा, महापौर यांचे अतिक्रमण विभागाला कडक आदेश

जळगाव, दि. ५ (जनसंवाद live): जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दालनात बुधवारी ४ मार्च रोजी शहर फेरीवाला समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील हॉकर्सचा प्रश्न, वाढती गर्दी आणि अतिक्रमणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. महापौर दीपमाला काळे यांनी अनधिकृत हॉकर्सवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देत, अतिक्रमण विभागाला ‘वशिलेबाजी’ न करण्याच्या सूचना दिल्या.

या बैठकीला महापौर दीपमाला काळे यांच्यासह उपमहापौर मनोज चौधरी, मोहन तिवारी, नंदू पाटील आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हॉकर्स समितीच्या प्रतिनिधींनी यावेळी आपल्या विविध मागण्या आणि अडचणी मांडल्या. शहरात टाईम झोन निश्चित करून त्यानुसार हॉकर्सला व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी समितीने केली. फुले मार्केटमध्ये ज्या २६५ जणांना बसण्याची जागा दिली आहे, त्यांना प्राधान्याने अधिकृत जागा उपलब्ध करून द्यावी. हॉकर्सनी व्यवसाय संपल्यानंतर परिसर स्वच्छ ठेवावा, अशा सूचना केल्या.

महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले की, व्यवसाय संपल्यानंतर हातगाड्या त्याच ठिकाणी सोडून जाऊ नयेत, अन्यथा कारवाई केली जाईल. बैठकीत काही हॉकर्सनी तक्रार केली की, अतिक्रमण विभाग केवळ गरीब विक्रेत्यांवर कारवाई करतो, तर अरेरावी करणाऱ्यांवर दुर्लक्ष करतो. यावर महापौरांनी संताप व्यक्त करत स्पष्ट आदेश दिले की, “कोणाचाही फोन आला तरी डगमगू नका, अनधिकृत हॉकर्सवर तात्काळ दंडात्मक कारवाई करा. आम्हा लोकप्रतिनिधींना अतिक्रमण दिसते, मग अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना का दिसत नाही?” असा सवाल त्यांनी केला. महामार्गावरील अतिक्रमण देखील पुढील दोन ते तीन दिवसांत काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सुभाष चौक, चित्रा चौक आणि बळीराम पेठ या भागांतील गर्दीचा उप महापौर मनोज चौधरी यांनी उल्लेख करत परिस्थिती बदलण्याचे निर्देश दिले. पिंप्राळा व इतर भाजी बाजारात मनपा कंटेनर ठेवणार असून, विक्रेत्यांनी कचरा त्यातच टाकावा, असेही त्यांनी सांगितले.

हॉकर्स समितीने दिलेल्या माहितीनुसार, २०१४ च्या सर्व्हेत २,९५० नोंदणीकृत हॉकर्स होते. मात्र, २०२२ च्या सर्व्हेनुसार ही संख्या ६,००० च्या वर गेली आहे. अनधिकृत फेरीवाल्यांमुळे शहराचे नियोजन कोलमडत असून, त्यांच्यावर चाप लावण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

पुढील बैठक १५ तारखेनंतर होणार असून, त्यामध्ये हॉकर्स झोनची अंतिम निश्चिती आणि पुढील धोरण ठरवले जाईल. एकदा हॉकर्स झोन निश्चित झाले की, विनाकारण पावती फाडण्याचा त्रास होणार नाही, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button