Breaking
ताज्या बातम्याजळगावसामाजिक

दक्षा फाउंडेशन तर्फे आत्महत्या प्रतिबंध व प्रबोधन समिती गठीत करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव, दि. १० (जनसंवाद live): दरवर्षी १० सप्टेंबर हा दिवस “जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन” म्हणून पाळला जातो. या दिवसाचे औचित्य साधून दक्षा फाउंडेशन तर्फे जळगाव जिल्ह्यामध्ये एक स्वतंत्र “आत्महत्या प्रतिबंध व प्रबोधन समिती” तातडीने गठित करण्यात यावी यामागणीचे निवेदन गुरूवारी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना देण्यात आले. यावेळी दक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष सपकाळे, तृषाल सोनवणे, सतीश महाजन, राजू डोंगरे, कमलेश डांबरे, हरिओम सूर्यवंशी, बबलू सपकाळे, सौ. पेंढारकर आदि उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये आत्महत्यांच्या घटना चिंताजनक प्रमाणात घडत असून, जानेवारी २०२६ ते जून २०२६ पर्यंत ४४३ आत्महत्या फक्त ६ महिन्यात झाल्या आहेत. ही एक अत्यंत महत्वाची गंभीर समस्या आहे. त्यात जास्ती प्रमाण युवक आणि युवती १६ ते २६ वयोगटातील आहेत. या घटनांमुळे अनेक कुटुंबांचे मोठे सामाजिक, आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे. आत्महत्या ही केवळ एका व्यक्तीची समस्या नसून ती संपूर्ण कुटुंब आणि समाजावर दीर्घकालीन परिणाम करणारी गंभीर सामाजिक समस्या आहे.

या पार्श्वभूमीवर, मी मागील चार ते पाच वर्षांपासून वेळोवेळी जळगाव जिल्हा प्रशासन, मा. मुख्यमंत्री महोदय, मा. उपमुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य महिला आयोग तसेच मा. राज्यपाल महोदय यांच्याकडे जळगाव जिल्ह्यात आत्महत्या प्रतिबंधासाठी प्रभावी जनजागृती व प्रबोधन यंत्रणा उभारण्याबाबत निवेदने सादर केल्याचे
दक्ष फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष सपकाळे यांनी निवेदनात म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये एक स्वतंत्र “आत्महत्या प्रतिबंध व प्रबोधन समिती” तातडीने गठित करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

सदर समितीमध्ये खालील क्षेत्रातील अनुभवी व सामाजिक जाणीव असलेल्या व्यक्तींचा समावेश करण्यात यावा-

१. निवृत्त मुख्याध्यापक व शिक्षणतज्ज्ञ

२. निवृत्त न्यायाधीश / कायदेतज्ज्ञ

३. निवृत्त पोलीस अधिकारी

४. निवृत्त डॉक्टर व मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ

५. समुपदेशक व मानसोपचार तज्ज्ञ

६. सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी

७. शिक्षण, महिला व बालविकास तसेच संबंधित शासकीय विभागांचे प्रतिनिधी

सदर समितीमार्फत जळगाव जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था व ग्रामीण भागात वेळोवेळी जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. विद्यार्थ्यांमध्ये व युवकांमध्ये मानसिक तणाव, नैराश्य, कौटुंबिक समस्या, आर्थिक अडचणी, परीक्षेचा ताण, व्यसनाधीनता तसेच इतर कारणांमुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक विचारांबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात यावे. तसेच विद्यार्थ्यांना व नागरिकांना हे पटवून देणे आवश्यक आहे की, कोणतीही समस्या आत्महत्येपेक्षा मोठी नसते आणि प्रत्येक समस्येवर संवाद, समुपदेशन व योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून मार्ग काढता येऊ शकतो.

म्हणून जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन, दि. १० सप्टेंबर याचे औचित्य साधून जळगाव जिल्हा प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन जळगाव जिल्ह्यासाठी स्वतंत्र “आत्महत्या प्रतिबंध व प्रबोधन समिती” गठित करावी, तसेच समितीमार्फत सातत्यपूर्ण जनजागृती व प्रतिबंधात्मक कार्यक्रम राबविण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button