Breaking
जळगावताज्या बातम्या

महापालिका रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सज्ज, महापौर दीपमाला काळे यांच्याकडून आरोग्य सुविधांचा आढावा

जळगाव, दि.११ (जनसंवाद live): जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी शहरातील विविध मनपा रुग्णालयांना भेटी देऊन तेथील आरोग्य सुविधांची सविस्तर पाहणी केली. छत्रपती शाहू महाराज रुग्णालय आणि भिकमचंद जैन प्रसूतीगृह या ठिकाणी भेट देऊन त्यांनी रुग्णांना मिळणाऱ्या सेवा, स्वच्छता आणि उष्माघात कक्षाच्या तयारीची माहिती घेतली.

महापौरांनी सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलला भेट दिली. हे रुग्णालय जे.पी. ट्रस्टतर्फे चालविले जात असून, ट्रस्टने रुग्णालयाची अतिशय उत्तमरित्या काळजी घेतल्याचे यावेळी दिसून आले. रुग्णालयातील कार्डियालॉजी, स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र, मेडिसिन, एक्स-रे, सोनोग्राफी, बालरोग विभाग, सुपर स्पेशालिटी विभाग, शस्त्रक्रिया गृह, अतिदक्षता विभाग (ICU) आणि लॅबोरेटरी अशा सर्व विभागांची महापौरांनी पाहणी केली.

रुग्णालयातील पुरेसे मनुष्यबळ आणि अत्याधुनिक सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. विशेषतः रुग्णालयातील स्वच्छता आणि रुग्णांच्या सोयीसाठी लावण्यात आलेले दिशादर्शक फलक यांचे त्यांनी कौतुक केले. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश चौबे आणि प्रशासकीय अधिकारी संतोष नवगाळे उपस्थित होते.

भिकमचंद जैन प्रसूतीगृहात मनुष्यबळ भरतीचे आश्वासन

महापौरांनी शिवाजीनगर येथील भिकमचंद जैन प्रसूतीगृह रुग्णालयाला भेट दिली. या ठिकाणी सध्या केवळ क्षयरोग विभागाची ओपीडी सुरू असून प्रसूतीगृह बंद आहे. हे प्रसूतीगृह भविष्यात पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले. या भेटीदरम्यान कर्मचाऱ्यांनी कक्ष सेवक आणि परिचारिका वर्गाची प्रचंड कमतरता असल्याचे महापौरांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यावर बोलताना महापौर म्हणाल्या, “पुढील महिन्याभरात येथे रिक्त जागांवर भरती प्रक्रिया राबवता येईल का, याचा प्रशासन नक्कीच गांभीर्याने विचार करेल.” यावेळी आशा वर्कर्सनी देखील महापौरांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी दोन्ही रुग्णालयांतील उष्माघात (Heat Stroke) कक्षाची विशेष पाहणी केली.या पाहणी दौऱ्यात महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी मनीषा उगले, डॉ. पूजा कोल्हे, डॉ. सायली पवार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

खाटा राखीव
शाहू महाराज रुग्णालय: ४ खाटा राखीव.
भिकमचंद जैन रुग्णालय: ७ खाटा राखीव.

“उष्माघाताची कोणतीही लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने जवळच्या मनपा रुग्णालयात येऊन उपचार घ्यावेत,” असे आवाहन महापौर दीपमाला काळे यांनी यावेळी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button