Breaking
उद्योगजळगाव

‘आयटी आणि सुरक्षा एक्स्पो २०२६’ चे शानदार उद्घाटन

जळगाव, दि.१३ (जनसंवाद live): माहिती तंत्रज्ञान आणि सुरक्षा क्षेत्रातील नवनवीन बदलांची ओळख करून देण्यासाठी ‘जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटना’ (JJITA) तर्फे आयोजित ‘JJITA आयटी आणि सुरक्षा एक्स्पो २०२६’ चे शानदार उद्घाटन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १३) पार पडले. शहरातील खान्देश सेंट्रल मॉल येथे १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.

​या सोहळ्याला जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेचे अध्यक्ष अतुल पाटील, सीपी प्लसचे क्षेत्रीय व्यवस्थापक प्रविण पाटील, प्रमा कंपनीचे अंकुर ढोले, ऑल कनेक्टचे संदिप बिरारी, पवन मंधारे, चेतन गावंडे, पुणे असोसिएशनचे राहुल खुर्द, सिबा पाठक, आनंद जगदाळे, धुळे असोसिएशनचे प्रशांत देवरे यांची विशेष उपस्थिती होती.

​जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये ‘एआय’चा वापर करणार – जिल्हाधिकारी
​स्वतः सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी यावेळी तांत्रिक विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “संगणकातील व्हायरस संक्रमणाबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे असून सिक्युरिटी प्रॉडक्ट निवडताना गुणवत्तेवर भर दिला पाहिजे. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये, विशेषतः सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ‘कम्प्युटर व्हिजन’ आणि ‘एआय आधारित अलर्ट जनरेशन’ तंत्रज्ञानाचा वापर आम्ही करणार आहोत. व्हिडिओ फीडच्या विश्लेषणातून एआयद्वारे चांगले निष्कर्ष काढता येतात.” आयटी आणि सिक्युरिटी इंडस्ट्रीमधील जनजागृती महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक केले.

​एक्स्पो मध्ये आयटी प्रॉडक्ट्स, अत्याधुनिक सिक्युरिटी सिस्टिम्स, एआय (AI) आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि सोलर पॅनल यासह विविध स्टॉल लावण्यात आले आहेत.
​दरम्यान प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी करत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली.

​कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे उपाध्यक्ष सुनील घोलप, सचिव सुरेंद्र मेहेंदळे, योगेश चौधरी, विनोद सोनार, संदिप राठोड आणि निलेश जैन यांनी परिश्रम घेतले. जास्तीत जास्त नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button