Breaking
गुन्हेक्राईमताज्या बातम्याराजकारण

कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी, विजय चौधरी पोलीसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नंदुरबार, दि. ७ (जनसंवाद live): कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात भाजपचे तत्कालीन उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांना धुळे येथून ताब्यात घेण्यात आले. नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी (ता. ६) रात्री आठच्या सुमारास ही कारवाई केली. त्यानंतर चौधरी यांना नंदुरबार येथे आणण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावरील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू होती.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात मंदार चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय चौधरी यांच्या स्वीय सहायकाविरुद्ध नंदुरबार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी काही दिवसांपूर्वी संबंधित स्वीय सहायकाला अटक केली आहे. दरम्यान, कथित ऑडिओ क्लिपमध्ये माजी खासदार डॉ. हीना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रोहन गावित यांच्या फिर्यादीवरून विजय चौधरी यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीसह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेची धुळ्यात कारवाई:
गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. गोपनीय माहितीच्या आधारे हे पथक धुळे येथे रवाना झाले. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास पथकाने विजय चौधरी यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पुढील चौकशीसाठी नंदुरबार येथे आणण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button