Breaking
जळगावताज्या बातम्याराजकारण

महापौर दीपमाला मनोज काळे यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त विशेष लेख

जळगाव, दि. १३ (जनसंवाद live): जळगाव शहराच्या प्रथम नागरिक आणि महानगरपालिकेच्या १७ व्या महापौर दीपमाला मनोज काळे यांचा १३ जुलै रोजी वाढदिवस आहे. जळगाव शहर महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये ‘बिनविरोध नगरसेवक’ आणि त्यानंतर ‘बिनविरोध महापौर’ म्हणून निवड होण्याचा एक ऐतिहासिक बहुमान त्यांना लाभला आहे. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्वाचा, क्रीडापटूच्या जिद्दीचा आणि जळगाव शहरासाठी त्यांनी आखलेल्या ‘व्हिजन जळगाव’चा घेतलेला हा विशेष गौरव लेख…

क्रीडापटूची जिद्द आणि उच्चशिक्षित नेतृत्व

महापौर दीपमाला काळे या एक उच्चशिक्षित महिला असून त्यांनी बी.एस.सी. (B.Sc.) ची पदवी संपादन केली आहे. शिक्षण क्षेत्रासोबतच त्यांची खरी ओळख एक उत्तम ‘मॅरेथॉनपटू’ आणि ‘सायकलपटू’ म्हणून आहे. त्यांनी सातारा मॅरेथॉन, टाटा मुंबई मॅरेथॉन आणि जळगाव, सातारा, त्र्यंबकेश्वर (ब्रह्मगिरी परिक्रमा) यांसारख्या हाफ मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून यश संपादन केले आहे. इतकेच नव्हे तर, आषाढी एकादशीनिमित्त जळगाव ते पंढरपूर हा तब्बल ४८५ किलोमीटरचा प्रवास त्यांनी सायकलद्वारे सलग तीन दिवसांत पार करून एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. क्रीडा क्षेत्रातील हीच जिद्द, कष्टाळू वृत्ती आणि शिस्त आज त्यांना जळगावच्या विकासाचे कठीण निर्णय घेण्यासाठी अत्यंत पूरक ठरत आहे.

‘व्हिजन जळगाव’: स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त शहराचा ध्यास

महानगरपालिकेची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांनी जळगाव शहराच्या प्रतिमेला उंचावण्यासाठी ‘व्हिजन जळगाव’ हा मुख्य संकल्प लोकमतच्या व्यासपीठावरून मांडला होता. केवळ मोठ्या प्रकल्पांवर अवलंबून न राहता प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर शहराचा चेहरा बदलण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचे प्रमुख पैलू खालीलप्रमाणे आहेत….
एंट्री पॉईंटचा बदलणार चेहरा : शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे आणि शिस्तबद्ध करणे.
डम्पिंग ग्राउंडमुक्त प्रवेशद्वार: ज्या प्रवेश मार्गांवर कचरा टाकला जातो, त्या जागा कायमस्वरूपी स्वच्छ करून तिथे सुशोभीकरण करणे.
पहिली ओळख, उत्तम ओळख: बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या मनात जळगावाबद्दल ‘बेशिस्त शहर’ ऐवजी ‘स्वच्छ आणि सुंदर शहर’ अशी नवी प्रतिमा निर्माण करणे.
वचनपूर्तीचा ध्यास : महायुतीने जाहीरनाम्यात दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची प्रत्यक्ष जमिनीवर अंमलबजावणी करून जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरवणे.

संवेदनशील आणि कौटुंबिक संस्कारांची शिदौरी

दीपमाला काळे यांना राजकीय आणि सामाजिक सेवेचा वारसा घरातूनच लाभला आहे. त्यांच्या मातोश्री अलका गोपाळ महाजन या १९८५ ते १९९० या काळात नगरसेविका व शिक्षण मंडळाच्या सभापती होत्या, तसेच त्यांचे आजोबा स्व. दशरथ महाजन व काका स्व. युवराज महाजन हे देखील नगरसेवक होते. त्यांचे चुलत सासरे पांडुरंग (बंडूदादा) रघुनाथ काळे आणि चुलत सासू सुधा काळे हे दोघेही नगराध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांच्या या यशात त्यांचे पती मनोज उर्फ पिंटू अनंत काळे (माजी नगरसेवक) आणि संपूर्ण काळे परिवाराची खंबीर साथ लाभली आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच जळगावकरांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या अहोरात्र तत्पर असतात.

आधुनिक आणि सुरक्षित जळगावची निर्मिती

शहरातील महिलांच्या दृष्टीने शहर अधिक सुरक्षित असणे, लहान मुलांसाठी प्रत्येक कॉलनीत मनपाच्या जागेवर खेळाची मैदाने उपलब्ध करणे आणि मेहरूण तलावाजवळ ‘जळगाव जिल्हा वैशिष्ट्ये’ दर्शन घडवणारी ग्रीन पार्क, बटरफ्लाय गार्डन वा बॉटनिकल गार्डन यांसारखे उपक्रम उभारून शहराच्या सौंदर्यात भर घालणे हा त्यांच्या नियोजनाचा मुख्य भाग आहे. तसेच शहरातील खेळाडूंसाठी रनिंग ट्रॅक आणि सायकलिंग ट्रॅकची निर्मिती व्हावी, यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील राहिल्या आहेत.
सदिच्छा आणि प्रार्थना!

आपल्या कष्टाच्या, जनसंपर्काच्या आणि प्रामाणिक निष्ठेच्या बळावर जळगावचा कारभार सांभाळणाऱ्या लाडक्या महापौर दीपमाला मनोज काळे यांना ४४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जळगावकरांच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा!

विठू माऊली त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो आणि जळगावला एक ‘स्वच्छ, सुंदर, सुटसुटीत आणि प्रगत शहर’ बनवण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अथांग शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button