प्रवासांच्या सुविधेसाठी आज पासुन जळगाव विमानतळावर २५ दिवसीय ‘प्रवासी सेवा अभियान’

जळगाव, दि. १७ (जनसंवाद live): भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्यावतीने देशभरातील विमानतळांवर राबविण्यात येणाऱ्या ‘प्रवासी सेवा अभियाना’त जळगाव विमानतळाचाही सहभाग राहणार आहे. १७सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत २५ दिवसीय हे अभियान राबविण्यात येणार असून, प्रवासांचा विमान प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ, सुविधाजनक आणि त्रासमुक्त करण्यावर भर दिला जाणार आहे. या अभियानादरम्यान प्रवासी सुविधा, स्वच्छता, सुलभता, माहितीचा प्रभावी प्रसार, सेवेची गुणवत्ता आणि तक्रारींचे जलद निवारण याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
विमानतळावरील कर्मचारी आणि सेवा पुरवठादारांनी प्रवाशांशी अधिक संवेदनशील व प्रवासी-केंद्रित पद्धतीने संवाद साधावा, यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे. अभियानादरम्यान ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले, दिव्यांग, तसेच विशेष मदतीची आवश्यकता असलेल्या प्रवाशांना प्राधान्याने आवश्यक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. अभियानाच्या शुभारंभानिमित्त १७सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन, ‘फास्ट लेन असिस्ट’ उपक्रम, प्रवाशांच्या स्वागतासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि ‘सर्व्हिस विथ स्माइल’ या उपक्रमांचा समावेश आहे. २५ दिवसीय अभियानाच्या काळात जळगाव विमानतळावर विविध प्रवासी-केंद्रित उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये स्वच्छ व स्वागतार्ह लँडसाइड परिसर, सुधारित पार्किंग व्यवस्था, आगमन प्रक्रिया सुलभ करणे, पुरेशी आसन व्यवस्था आणि सेवा गुणवत्तेचे नियमित परीक्षण यांचा समावेश आहे.
विमानतळावरील दिशादर्शक व मार्गदर्शन व्यवस्था, सुरक्षित सामान हाताळणी, सुरळीत सुरक्षा तपासणी, पिण्याचे पाणी, आवश्यक सुविधा, डिजिटल प्रवासी सेवा आणि कुटुंबांसाठी अनुकूल सुविधा उपलब्ध करून देण्यावरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे. अशी माहिती हर्ष कुमार त्रिपाठी, विमानतळ संचालक, भारतीय विमानतळ प्राधिकरण, जळगाव विमानतळ यांनी प्रसिद्धी पत्रककाद्वारे दिली आहे.




